म्हणजे असं..
खायला काय बनवायचं ह्या डोक्याचा भुगा करणाऱ्या विचाराने आधी झपाटून घ्या. मग घरातल्या सदस्यांचे जनमत वगैरे घ्या..मग ठरलेला मेनू निगुतीने बनवा..मग जेवण करा. ह्याचसाठी-केला-होता-सगळा-अट्टाहास असे असले तरी हा सगळ्यात कमी वेळ घेणारा टप्पा असतो संपूर्ण मालिकेतला.
आणि मग..भांडी आवरा, किचन आवरा, लख्ख करा (इथे प्रत्येक गृहिणीची व्याख्या आणि निकष वेगवेगळे)
आणि मग जो येतो तो अजुन कठीण टप्पा..शिल्लक राहिलेल्या पदार्थांचे व्यवस्थापन!
कारण कितीही मोजून मापून करायचं म्हटलं तरी बनवताना तुम्हाला भूक लागलेली असल्यामुळे तुमच्या गणिताचे बारा वाजणारच असतात..
तर.. खूप उरलं तर एकवेळ पुढच्या वेळच्या जेवणाचा किमान निम्मा प्रश्न तरी सुटतो..पण वाटी, अर्धी वाटी असे अस्तित्व जर ते पदार्थ शिल्लक ठेऊन गेले तर खरा ताप सुरू होतो..
व्यवस्थित मापाचे फ्रिजमध्ये ठेवता येतील असे डबे, भांडी, झाकणं शोधा..कितीही असली तरी कमीच पडतात ही..त्यामुळे शोधता शोधता ह्या वर्गाचा स्टॉक अजून भांडी आणून वाढवावा वगैरे प्लॅन तुमच्या डोक्यात आकार घ्यायला सुरुवात करतात..तर असो..
आणि मग पुढचा कठीण टप्पा (पातळी वाढतच जाते ही)..
जे-का-उरले-सुरले-त्यासी-म्हणे-जो-आपुले ह्या उक्तिसाठीच ज्याने स्वतःचे जीवन वाहून घेतलेले असते त्या फ्रिज मध्ये जागा शोधा, नसेल तर निर्माण करा. अशक्य-काहीही-नसतं असा आत्मविश्वास निर्माण करणारा अनुभव असतो हा!!
त्या फ्रिजची लोकल, पी एम टी वगैरे झालेली असते कधी कधी. तरी थोडं सरकून घ्या, adjust करा म्हणत म्हणत येणारे आत येतच राहतात. अपग्रेड मारून त्याची मेट्रो करावी म्हणून मोठा फ्रिज घेतला तरी ह्या परिस्थितीत सुधारणा होणे शक्य नसते..
तर ही सगळी कसरत करून तुम्ही स्वत:ची पाठ थोपटून घेत निदान त्या वेळेसाठी तरी किचनला राम-राम म्हणता..पुढच्यावेळी येणाऱ्या गहन प्रश्नांना खंबीरपणे सामोरं जाण्यासाठी..
आणि मग पुढच्या जेवणाची वेळ होते…
काय बनवावं म्हणून तुम्ही फ्रिज उघडता (जसे तुम्हाला आत जे काही आहे ते बघून तो तुम्हाला पर्याय सुचवणार असतो 😂)
तर आधीचा प्रत्येक बॅकलॉग “मैं यहाँ हू, यहाँ हू, यहाँ हू, यहाँ!!!!” गात तुमचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतो.. (एवढ्या गदारोळातही मनातल्या मनात तुम्ही: “कुठल्या फिल्म मधलं बरं हे गाणं? हा.. वीर झारा, झारा..स्वयंपाक करतानाच सुचलं असेल हे नाव, ज्याने कुणी काढला त्याला”..म्हणजे का-ही-ही 😂😂)
स्टॉक टेकिंग झाल्यावर तुम्ही तुम्हाला तुमच्या आजी, आई, मावशी अश्या समस्त अनुभवी मंडळींकडून वारश्यात मिळालेली क्रिएटिव्हीटी वापरायची ठरवता. अश्यावेळी जनमत वगैरे घेण्याच्या भानगडीत पडायचं नसतं हा सुज्ञपणा तुम्हाला हळू हळू येतोच. 😂
तर भाजी, वरण वर्गाचे नुतनीकरण करुन थालिपीठं बनवायची. हे इतकं बिंबवलं गेलं आहे की सकाळी ताटात थालीपीठ बघितलं की माझा एक मावसभाऊ त्याच्याही नकळत विचारतो, “रात्री काय होतं जेवायला?” 😂
पोळ्या असल्या तर फोपो (फोडणीची पोळी). काळासोबत वाटचाल करत त्या पोळ्यांचा चीज वगैरे उपलब्ध असले तर quesadilla ही बनून जातो कधी कधी. पण ते शक्य नसलं तर फोपो जिंदाबाद.
भाताला फोडणी लागते, तर कधी दहीभात वगैरे.
आता पुढचा टप्पा..
कौशल्यपूर्ण मार्केटिंग करून रेनोवेशन खपवणे, आणि जमलेच तर पुढच्या वेळेसाठी लोकप्रियता निर्माण करणे..
मागे मला फेसबुकवर एका महाराष्ट्रीयन पदार्थांच्या ग्रुपमूळे फोपोला “माणिकपैंजण” असेही catchy नाव आहे हे कळले आणि त्या नावाखाली मी मुलाला फोपो खपावायचा प्रयत्न केला होता. पण त्याने “आई, हा तर कुस्करा आहे पोळ्यांचा” म्हणून पुढच्याच क्षणी माझा प्रयत्न हाणून पाडला. 🙄 असो..
तर असे नवे रूप घेऊन आलेले पदार्थ जर घरातल्या सदस्यांनी वाह वाह करत फस्त केले तर आकाश फक्त दोन-चार बोटं उरतं तुम्हाला. पण तसे होत नाहीये असे चित्र तयार व्हायला लागले की धाकधूक सुरू होते संपतील की नाही ह्याची. कारण जन्म-मरणाच्या फेऱ्याचे माहीत नाही पण ह्या उरण्या-संपवण्याच्या चक्रातून एक दिवस जरी मुक्ती मिळाली तरी जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटते.
मलाही आणि अर्थात त्या फ्रिजलाही.
मोकळा श्वास घेतो मग आम्ही हे असलं काही कल-हो-ना-हो म्हणत 😂
आणि कदाचित अश्याच एका जन्म सार्थकी लागलेल्या दिवशी कुठल्यातरी गृहिणीने फोपोचे नामकरण माणिक पैंजण असे केले असेल 😂😂
तळटीप – संदर्भात फक्त श-श-श-श-शारुखचे पिक्चर येणे हा निव्वळ योगायोग आहे 😂