मेलबॉक्स तपासणं हे एक अतिशय कंटाळवाणं काम आहे इकडे. भारंभार जाहिराती, promotional offers ची रद्दी नुसती.. त्यांची भाषा अशक्य आपुलकी आणि अतिशय काळजीच्या स्वरात करण्याच्या नादात एवढी कृत्रिम आणि कोरडी वाटते की अक्षरं आता गळून खाली पडतील असे वाटून जाते वाचता वाचता. महत्त्वाच्या गोष्टी तश्याही आजकाल फोन किंवा इमेलने कळवल्या जातात, त्यामुळे नाही check केले वेळच्या वेळी तरी फार काही बिघडत नाही. थोडक्यात चमत्कारिक असं काही निघत नाही त्या पेटाऱ्यातून. त्यामुळे ‘अनपेक्षित’ असा शिक्का मारलेला आनंद गवसण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. किंवा तशी अपेक्षाही करण्याचं विसरत चालले आहे मन आता!
तर अश्याच एका आजच्या रविवारी नवऱ्याने मेलबॉक्स रिकामं करण्याचं काम एकदाचं पूर्ण केलं. गठ्ठा स्वतः समोर ठेवला आणि कधी नव्हे ते एक एक लिफाफा चाळत खरंच काही महत्त्वाचं आहे का हे तपासण्याचं अजून एक निरस काम हाती घेतलं. आणि तेही स्वतः हून!! एवढा मोठा अनेपेक्षित आनंद नक्की दिला त्या मेलबॉक्सने आज 😂
तर सगळ्याच पत्रांवर साधारण ‘अनावश्यक’ असा शिक्का मारून झालेला असतांनाच एका पत्रावर हाताने माझा पत्ता लिहिलेला दिसला, शिक्का वॉशिंग्टन डीसी चा. लिफाफा उघडेपर्यंतच्या तेवढ्या अर्ध्या पाऊण मिनिटात हस्तलिखित पत्र मला तिथून कुणी पाठवू शकेल असं एकही नाव डोक्यात आलं नाही. Scan returned zero results. त्यामुळे उत्सुकता अजूनच ताणली जात होती.
पण..आतून खरंच खजिना निघाला! मागच्या महिन्यात माझी प्रोजेक्ट मॅनेजर पुढे अजुन शिक्षण घ्यायचं म्हणून राम राम म्हणून गेली, तिनं एक सुंदर note पाठवली होती पोस्टाने. मोजक्या ८,१० ओळी. पण अगदी मनापासून लिहिलेल्या. २ वर्षाच्या काळात एकाच टीम मध्ये असलो तरी वेगवेगळ्या शहरात राहून आम्ही काम करत होतो, २ वेळाच प्रत्यक्ष भेटण्याचा योग आलेला. पण wavelength मस्त जुळली होती. एकंदरीत सगळ्या अनुभवाला तिने थोड्या पण खऱ्या शब्दात व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत निरोप घेतला होता ह्या पत्रातून. पण नेमका असा अनपेक्षित आनंद देणारा अनुभव दिल्याने कायमचा निरोप तिला देणं आता कधीच शक्य नाही होणार. कायम लक्षात राहणार आता ती!
सोपं असतं नाही तसं असे छोटे छोटे पण सुखद आणि अविस्मरणीय क्षण इतरांच्या आयुष्यात पसरवणं? मनापासून केलेल्या गोष्टी विसरल्या नाही जात. पत्र हे एक खूप खूप उत्तम माध्यम आहे खरंतर अश्या पद्धतीने आपल्या लोकांच्या मनात घर करण्याचं किंवा आधीच अस्तित्वात असलेल्या घरात प्रकाश उधळण्याचं. कागदावरच्या त्या साध्या सरळ शब्दात असलेली मायेची आणि काळजीची ओल वाचणाऱ्याला जाणवल्याशिवाय राहत नाही! Social networking च्या कोरड्या notifications च्या जगात अशी ओल नक्कीच ताजं तवानी करणारी असते मनाला, अगदी थेंबभर असली तरी. कारण त्यात असते मनापासून काढलेली आठवण, तुफान वेगाने धावत असताना मनापासून काढलेला वेळ. लिहिलेले तर डोळ्यांना दिसत असतेच पण न लिहिलेले शब्दही पोचतात वाचणाऱ्याचा नकळत. जादू नुसती. पुन्हा कधीही काढून अनुभवता येऊ शकणारी. It simply makes you travel through time!
खरं बघायला गेलं ना तर WhatsApp सारखं खूप प्रभावी आणि सोयीचं माध्यम आहे आज प्रत्येकाकडे आपल्या लोकांसोबत क्षणात व्यक्त होण्यासाठी. Everything is literally at your finger tips! कागद, पेन शोधायची गरज नाही, पोस्टात जाऊन पत्र टाकायची गरज नाही. लिहायचं जे मुख्य काम आहे तेही सोपं झालंय. टाईपल की पुढच्या क्षणाला समोरच्याच जग उजळ. पण व्यक्त व्हायचंय कुणाला? संवाद करायचाय तरी कशासाठी? तिथं भावना नव्हे तर भाव-ना असे प्रकरण असते एकूण. नुसतीच ढकला ढकली. आला विनोद, ढकल पुढे, व्हिडिओ..ढकल पुढे, सगळ्या विषयांवरचे उच्च ज्ञान..ढकल पुढे. ढकला, नक्कीच..तेही उपयोगी किंवा गरजेचे असते बऱ्याचवेळा. पण त्यातले दोन क्षण जवळच्या लोकांना नुसते ‘कसे आहात?’ विचारायला तुम्हाला वेळ मिळत नाही किंवा जमत नाही हे खरंच न पटण्यासारखे आहे. 🙂 नको त्या मुद्द्यांवर लोक तिथे खोलात जातात आणि हवं तिथे नुसता उथळपणा. मोठा आणि ‘…शाप की वरदान’ सीरिज मधला विषय आहे तो.
थोडक्यात फोनही आता त्या मेलबॉक्ससारखा झालाय..अनपेक्षित आनंद देणारे, मना-मनांना जोडणारे messages आणि calls कधीतरी येतात..एरव्ही नुसत्या आयुष्याचा देखावा मांडणाऱ्या जाहिराती आणि promotional offers..कृत्रिम आणि कोरड्या. जेवढ्या वेगाने पाठवल्या जातात, तेवढ्याच वेगाने विसरल्याही जातात.
त्या गर्दीत येतात काही ‘हस्तलिखित’ पत्रांसारखी अनपेक्षित. त्यांना ‘स्टार’ करून जपता येते. त्यांना जपायचे, तेवढेच उजळून निघते तुमचे आकाश. 🙂
एरव्ही…मामाचीच काय इतर सगळीच पत्रं हरवलेली..
rpnn
मे 31, 2020 at 11:33 सकाळी
In my childhood the concept of ‘ pen friends’ gave lot of happiness. I think it’s disappeared.
Gayatri
सप्टेंबर 8, 2020 at 11:39 pm
So true!