RSS

.. पत्र हरवलं..

मेलबॉक्स तपासणं हे एक अतिशय कंटाळवाणं काम आहे इकडे. भारंभार जाहिराती, promotional offers ची रद्दी नुसती.. त्यांची भाषा अशक्य आपुलकी आणि अतिशय काळजीच्या स्वरात करण्याच्या नादात एवढी कृत्रिम आणि कोरडी वाटते की अक्षरं आता गळून खाली पडतील असे वाटून जाते वाचता वाचता. महत्त्वाच्या गोष्टी तश्याही आजकाल फोन किंवा इमेलने कळवल्या जातात, त्यामुळे नाही check केले ‌वेळच्या वेळी तरी फार काही बिघडत नाही. थोडक्यात चमत्कारिक असं काही निघत नाही त्या पेटाऱ्यातून. त्यामुळे ‘अनपेक्षित’ असा शिक्का मारलेला आनंद गवसण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. किंवा तशी अपेक्षाही करण्याचं विसरत चालले आहे मन आता!

तर अश्याच एका आजच्या रविवारी नवऱ्याने मेलबॉक्स रिकामं करण्याचं काम एकदाचं पूर्ण केलं. गठ्ठा स्वतः समोर ठेवला आणि कधी नव्हे ते एक एक लिफाफा चाळत खरंच काही महत्त्वाचं आहे का हे तपासण्याचं अजून एक निरस काम हाती घेतलं. आणि तेही स्वतः हून!! एवढा मोठा अनेपेक्षित आनंद नक्की दिला त्या मेलबॉक्सने आज 😂

तर सगळ्याच पत्रांवर साधारण ‘अनावश्यक’ असा शिक्का मारून झालेला असतांनाच एका पत्रावर हाताने माझा पत्ता लिहिलेला दिसला, शिक्का वॉशिंग्टन डीसी चा. लिफाफा उघडेपर्यंतच्या तेवढ्या अर्ध्या पाऊण मिनिटात हस्तलिखित पत्र मला तिथून कुणी पाठवू शकेल असं एकही नाव डोक्यात आलं नाही. Scan returned zero results. त्यामुळे उत्सुकता अजूनच ताणली जात होती.

पण..आतून खरंच खजिना निघाला! मागच्या महिन्यात माझी प्रोजेक्ट मॅनेजर पुढे अजुन शिक्षण घ्यायचं म्हणून राम राम म्हणून गेली, तिनं एक सुंदर note पाठवली होती पोस्टाने. मोजक्या ८,१० ओळी. पण अगदी मनापासून लिहिलेल्या. २ वर्षाच्या काळात एकाच टीम मध्ये असलो तरी वेगवेगळ्या शहरात राहून आम्ही काम करत होतो, २ वेळाच प्रत्यक्ष भेटण्याचा योग आलेला. पण wavelength मस्त जुळली होती. एकंदरीत सगळ्या अनुभवाला तिने थोड्या पण खऱ्या शब्दात व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत निरोप घेतला होता ह्या पत्रातून. पण नेमका असा अनपेक्षित आनंद देणारा अनुभव दिल्याने कायमचा निरोप तिला देणं आता कधीच शक्य नाही होणार. कायम लक्षात राहणार आता ती!

सोपं असतं नाही तसं असे छोटे छोटे पण सुखद आणि अविस्मरणीय क्षण इतरांच्या आयुष्यात पसरवणं? मनापासून केलेल्या गोष्टी विसरल्या नाही जात. पत्र हे एक खूप खूप उत्तम माध्यम आहे खरंतर अश्या पद्धतीने आपल्या लोकांच्या मनात घर करण्याचं किंवा आधीच अस्तित्वात असलेल्या घरात प्रकाश उधळण्याचं. कागदावरच्या त्या साध्या सरळ शब्दात असलेली मायेची आणि काळजीची ओल वाचणाऱ्याला जाणवल्याशिवाय राहत नाही! Social networking च्या कोरड्या notifications च्या जगात अशी ओल नक्कीच ताजं तवानी करणारी असते मनाला, अगदी थेंबभर असली तरी. कारण त्यात असते मनापासून काढलेली आठवण, तुफान वेगाने धावत असताना मनापासून काढलेला वेळ. लिहिलेले तर डोळ्यांना दिसत असतेच पण न लिहिलेले शब्दही पोचतात वाचणाऱ्याचा नकळत. जादू नुसती. पुन्हा कधीही काढून अनुभवता येऊ शकणारी. It simply makes you travel through time!

खरं बघायला गेलं ना तर WhatsApp सारखं खूप प्रभावी आणि सोयीचं माध्यम आहे आज प्रत्येकाकडे आपल्या लोकांसोबत क्षणात व्यक्त होण्यासाठी. Everything is literally at your finger tips! कागद, पेन शोधायची गरज नाही, पोस्टात जाऊन पत्र टाकायची गरज नाही. लिहायचं जे मुख्य काम आहे तेही सोपं झालंय. टाईपल की पुढच्या क्षणाला समोरच्याच जग उजळ. पण व्यक्त व्हायचंय कुणाला? संवाद करायचाय तरी कशासाठी? तिथं भावना नव्हे तर भाव-ना असे प्रकरण असते एकूण. नुसतीच ढकला ढकली. आला विनोद, ढकल पुढे, व्हिडिओ..ढकल पुढे, सगळ्या विषयांवरचे उच्च ज्ञान..ढकल पुढे. ढकला, नक्कीच..तेही उपयोगी किंवा गरजेचे असते बऱ्याचवेळा. पण त्यातले दोन क्षण जवळच्या लोकांना नुसते ‘कसे आहात?’ विचारायला तुम्हाला वेळ मिळत नाही किंवा जमत नाही हे खरंच न पटण्यासारखे आहे. 🙂 नको त्या मुद्द्यांवर लोक तिथे खोलात जातात आणि हवं तिथे नुसता उथळपणा. मोठा आणि ‘…शाप की वरदान’ सीरिज मधला विषय आहे तो.

थोडक्यात फोनही आता त्या मेलबॉक्ससारखा झालाय..अनपेक्षित आनंद देणारे, मना-मनांना जोडणारे messages आणि calls कधीतरी येतात..एरव्ही नुसत्या आयुष्याचा देखावा मांडणाऱ्या जाहिराती आणि promotional offers..कृत्रिम आणि कोरड्या. जेवढ्या वेगाने पाठवल्या जातात, तेवढ्याच वेगाने विसरल्याही जातात.

त्या गर्दीत येतात काही ‘हस्तलिखित’ पत्रांसारखी अनपेक्षित. त्यांना ‘स्टार’ करून जपता येते. त्यांना जपायचे, तेवढेच उजळून निघते तुमचे आकाश. 🙂

एरव्ही…मामाचीच काय इतर सगळीच पत्रं हरवलेली..

 
१ प्रतिक्रिया

Posted by on मे 25, 2020 in Misc

 

कोरोना डायरीज…

लॉकडाऊनचा हा साधारण ४था आठवडा आहे. काम घरून, पोरांच्या शाळा घरून. महत्त्वाच्या कामापुरतं बाहेर पडता येतं, वाण-सामान, औषधं वगैरे सारख्या गोष्टींसाठी. रस्ते, गावं, शहरं, देशच्या देश भकास पडली आहेत. स्वप्नवत वाटतं कधी कधी सगळं. आता जाग येईल आणि पुन्हा त्या नॉर्मल म्हणवणाऱ्या जगात आपण परतू. पण नाही होत तसं काही.

महीन्याभरपूर्वी कल्पनाही केली नव्हती गोष्टी अश्या काही बदलतील ह्याची. थोड्याफार फरकाने सगळ्यांचाच पुढच्या काही महीन्यांसाठी आपआपल्या आयुष्याचा बराचसा भाग planned out होता. गृहीतच धरतो ना आपण सगळं. उद्या उगवणार, आज आहे तसाच. सभोवतालही कुठे जाणार आहे, तिथेच आणि तसंच असणार आहे सगळं. दिवसाचं routine, आठवड्याचे, महीन्याचे, वर्षाचे, पंचवार्षिक… सगळ्या टप्प्यासाठी आपला प्लॅन तयार असतो. आशावाद वगैरे आहेच, पण कुठेतरी आपल्या हातात सगळं आहे हा विश्वास!

धडपडत चालायला शिकतो, मग छान चालायला जमलं की वेग घेऊन आपण धावायला लागतो..एकदा ती गती लाभली की ती सोडवत नाही, ती आपला ताबा घेते. थांबणं हा पर्याय असूच शकत नाही. एवढं गणित पक्कं आणि स्पष्ट होतं.. वैयक्तिक पातळीपासून जागतिक पातळीपर्यंत.

पण मग कोरोनाने सगळंच खोटं ठरवलं. प्रत्येकाला थांबायला भाग पाडलं. बाहेर खूप भटकून झालं म्हणून आतल्या प्रवासाची सक्ती केली. माणसं आज घरात रहाती झाली आहेत, कोषात जाऊन खरंच महत्त्वाच्या प्रश्नावर, मुद्द्यांवर विचार करती झाली आहेत. थोडे का असेना, संवाद घडायला लागलेत घरा घरात. लांबच्या आपल्या लोकांची पण आठवण होऊन काळजी वाटायला लागली आहे. काहींना शब्द सापडले आहेत आणि काही शोधायची तयारी दाखवत आहेत.

आहे त्या परिस्थितीला आपल्या परीने लोक सामोरी जात आहेत. काही अजूनही फाजील आत्मविश्वास घेऊन बागडत आहेत. ती लोकं कदाचित अजूनही denial mode मध्ये आहेत. त्यांची कथाच वेगळी आहे. पण ज्यांनी स्वीकारलंय तथ्य त्यातले काही प्रचंड काळजीत आहेत, तर काही सकारात्मक दृष्टीने आहे त्या परिस्थितीला सामोरं जात आहेत. प्रत्येकाची हाताळायची पद्धत वेगळी. प्रत्येकाची जडणघडण, पार्श्वभूमी त्यावर प्रभाव नक्कीच पाडते. उगम जरी एक असला तरी संघर्षाचं स्वरूप प्रत्येकासाठी वेगळं आहे.  विनोद करण्याची वृत्ती अजुन शाबूत आहे, दुःख हलकं करण्याचं प्रचंड सामर्थ्य नक्कीच असतं विनोदात. परिस्थितीचं गांभीर्य हरवायला नको एवढंच.

पण सगळ्यांनाच ही नुसतं घरात बसून बदल घडवून आणण्याची मुभा नाहीये लाभलेली. काहींचे एका रात्रीत jobs गेलेत. हातावर ज्यांचे पोट आहे त्यांच्यासमोर चे प्रश्न अजूनच अवघड झाले आहेत. डॉक्टर्स, पोलिस, सरकारी यंत्रणा front line वर लढा देत आहेत. आणि बरेच लोक हतबल होऊन लागण झालेल्या आपल्या जवळच्या लोकांना कायमचा निरोप देत आहेत शेवटची भेट घडायची संधी न मिळताच. कदाचित प्रथमच माणसाला “….मेरा गम कितना कम है” ही ओळ खऱ्या अर्थाने समजत आहे. काही शब्द, विचार, सुविचार माहीत असणे वेगळे आणि साक्षात्कार झाल्यासारखे त्यांचा खरा अर्थ कळणे हे पूर्णपणे वेगळे! माणूस एकमेकांच दुःख समजून घेतोय किंवा प्रयत्न तरी करतांना दिसतोय हे मात्र नक्की. जमेच्या बाजूत नोंदता येतील अश्या खूप गोष्टी घडत आहेत. सुखापेक्षा दुःखात माणसाला एकमेकांच्या जवळ आणण्याचे सामर्थ्य नक्कीच जास्त असते हे सतत अनुभवायला मिळतंय.

समूह म्हटला की अनेक स्तर आले – आर्थिक, सामाजिक, राजनैतिक, धार्मिक. अगदी वैयक्तिक पातळीवरही कितीतरी वेगवेगळ्या छटा असतात माणसाच्या, ठळक दोन – मानसिक आणि शाररिक. आणि ह्या सगळ्याच्या पलीकडे जो सगळ्यात महत्त्वाचा आणि किंबहुना सगळ्यात उपेक्षित आहे तो म्हणजे नैसर्गिक.

अश्या सगळ्याच पातळ्यांवर परिणाम करतोय हा एवढासा व्हायरस.

निसर्गाने “पुरे आता” म्हणत आपल्या हातात घेतली आहेत का चक्र? की ही आपल्याच कर्माची फळं?

उद्या कदाचित सगळं पुन्हा so called normal होईल ही..पण आज जे काही घुसळल जातंय मनामनात ते नक्कीच क्षणभंगुर असणार नाहीये. परिणाम दूरवर जाणवत राहतील. माणूस कदाचित माणूस म्हणून जास्त परिपक्व होईल किंवा कोरोनाला नियंत्रित करून कदाचित अजून जास्त उन्मत्तही!

मानवजात म्हणून एक collective असा जो काही मार्ग पत्करला जाईल तो महत्त्वाचा. न जाणो ही सगळी परिस्थिती मानवाला मिळालेली शेवटच्या काही संध्यांपैकी एक असावी अन् जे घडतंय ती एक रंगीत तालीम!

कुठल्याही विपदेसाठी आपण पूर्णपणे सुसज्ज असूच शकत नाही. पण आलेल्या परिस्थितीला कसं सामोरं जाऊ शकतो आणि त्यातून येणाऱ्या काळासाठी काय बोध घेऊ शकतो एवढं मात्र नक्कीच आपल्या हातात असते.

त्यासाठी सगळ्यांना आवश्यक ते बळ लाभो हीच सदीच्छा! 🙏

 

 
4 प्रतिक्रिया

Posted by on एप्रिल 13, 2020 in Life

 

थांबा-पहा-जगा…

Train station ते सध्याचे office हे अंतर साधारण १० मिनिटांचं आहे चालत. शहराचा मुख्य corporate area असल्यामुळे खूप सारे offices आणि खूप गर्दी! सतत वर्दळ असते सगळीकडे आणि वातावरणात नुसती घाई!

सुरुवातीला मस्त वाटायचं कारण सगळंच नवीन होतं. अन बघायला गेलं तर आहेच सुंदर सॅन फ्रांसिस्को! पण जस-जसा रोजचा होत जातो रस्ता तस-तशी नजर गृहीत धरते चांगल्या गोष्टी, अन मग दिसायला लागतात त्रुटी. तुडुंब वाहणारे रस्ते आणि footpath, त्यावरून आपल्याच विश्वात धावणारे मुखवटे म्हणा वा रोबोट्स.. “हर तरफ हर जगह बेशुमार आदमी, फिर भी तनहाईयों का शिकार आदमी!”

थोडक्यात अतिपरिचयात अवज्ञा!

Feel-good वगैरे वाटेल असं खूप खूप कमी दिसतं किंवा अनुभवायला मिळतं हल्ली, की माझंच मन बोथट होत चाललंय, संवेदना हरवत चाललीये आणि चांगलं ते हेरायला, “बघायला” विसरत चाललंय? शेवटी सगळं routine life पाशी येऊन थांबतं. चांगला बळीचा बकरा आहे ते कारण, सगळं काही त्यावर थोपवून मोकळे 😀

अन मग चालता चालता एखाद दिवस पर्यटक म्हणून आलेला कुणी बघायला मिळतो, ज्याच्या डोळ्यात कौतुक असतं शहराबद्दलचं . कॅमे-यातून आपल्याला अगदी साधारण वाटेल अश्या जागेचा, गोष्टीचा फोटो घेऊन त्याची आठवण म्हणून साठवण करण्यासाठी त्यांची धडपड सुरु असते आणि जे तुम्हाला विचारात पाडतं.

अजब असतो आपण. माणूस म्हणा, जागा म्हणा, वा वस्तू म्हणा, नसतात तेव्हा मिळवण्याची आणि अनुभवण्याची धडपड, मिळाल्या की आपल्या झाल्याचा आनंद आणि मग रोजच्या झाल्या की घरकी-मुर्गी-दाल-बराबर mode मध्ये जाऊन कौतुक असे काही उरतच नाही. बदलतं काय तर आपण आणि आपलीच नजर किंवा दृष्टीकोण.

हो, म्हणजे वेळेसोबत किंवा जास्त परिचयातून सध्या हाती आहे ते सगळं कसं एवढंही भारी किंवा अर्थपूर्ण नाहीये ही भावना येऊ शकते, पण..पण काहीतरी x-factor तर नक्की असेल ज्यानं एकेकाळी तुम्ही झपाटला होता इथवर पोचण्यासाठी? प्रचंड मेहनत घेतली होती आणि खूप खटाटोप केला होता. तुमच्यासाठी ‘रोजचं झालं’ असलं तरी जगाच्या अनेक कोपऱ्यात हे ‘रोजचं असणं’ एक मोठं स्वप्न असलेली झपाटलेली लाखो मनं असतील, अगदी तुमचं काही वर्षांपूर्वी होतं तशी!

बदल, प्रगती हवीच असते माणसाला, थोडा-और-चलेगा करत करत. Basic feature आहे ते आपलं! अन म्हणूनच चढाई करून झाल्यावर आहे त्या शिखरावर फार वेळ चित्त लागत नाही. महत्त्वाकांक्षा आणि समाधान ह्यांचा ताळमेळ बसवणे आणि कुठल्यातरी टप्प्यावर कायमचा तंबू ठोकणे हा स्वतंत्र विषय!

पण एक शिखर सर केल्यावर पुढचं बघता येणं आणि त्या दिशेने वाटचाल सुरु करणं जेवढं महत्त्वाचं, तेवढंच महत्त्वाचं असतं ते आहे त्या शिखराची “तिथं असतांनाच” किंमत कळणं आणि तिथं असणं भरभरून जगता येणंही. उगाच पुन्हा भविष्यात हुरहूर नको मागे काय सुटून गेलं ह्याची. 🙂

 
यावर आपले मत नोंदवा

Posted by on जानेवारी 9, 2019 in Life

 

गाणेमन…

मला आठवतंय माझ्या लहानपणी आईला आवड होती स्वयंपाक करताना गाणी ऐकायची, जुनी गाणी. लता, आशा, किशोर कुमार, मोह. रफी…नकळत कानावर पडून पडून “चांगली” गाणी कळायला लागली. शब्द म्हणा, चांगले beats म्हणा. खोल, गहन अर्थ वगैरे कळायचे वय नसले तरी तेव्हापासून डोक्यात कायमचे घर करून बसली ती गाणी..

पप्पानी तेव्हा Philips चा २-इन-१ टेप रेकॉर्डर आणलेला, पार सुरतेवरून मागवला. गावात एक कॅसेट “भरून” देणारा होता. हव्या त्या गाण्याची यादी आणि एक कॅसेट द्यायची, साधारण १० रुपयात गाणी टाकून मिळायची. भारी ritual होते ते, अगदी विचार करून, आठवून आठवून गाण्याची यादी बनवायची शक्य तेवढे details देऊन. त्यामुळे कदाचित गाण्याचा metadata लक्षात ठेवायची सवय लागून गेली, कोणी गायलं, कोणता movie, कोण संगीतकार. १०-१२ गाणी मावायची एका कॅसेट मध्ये. त्यामुळे अगदी जपून जपून गाणी निवडायची. त्यात घरातले सगळेच वाटेकरी असायचे त्यामुळे quota असायचा. कोरी कॅसेट मिळायची तशी त्या काकाकडे पण आम्ही सहसा घरातल्याच जुन्या हुडकून न्यायचो..पप्पा घरात प्रवचनाच्या खूप साऱ्या कॅसेट्स आणत, त्यावर विशेष नजर असायची आमची 🙂 तर मग सगळे basics जमवून जायचे दुकानात, पुढचे tension म्हणजे त्या काकाकडे आपण निवडलेली सगळी गाणी असणे. लॉटरी लागण्याइतकं सुख असायचं. नसलं एखादं गाणं तर backup list ला तसा तोटा नसायचा. हे सगळं झालं की मग वाट पाहणं आलं. एकदाची तयार झाली कॅसेट की मग काहीतरी साध्य वगैरे केल्याचे feeling यायचे! कारण त्या process मध्ये जीव गुंतलेला असायचा..

पप्पा शक्यतोवर भजन, भक्तिगीतं आणि प्रवचन वगैरे ऐकण्यासाठी वापरत टेप. सगळ्यात मोठा वापर म्हणजे सकाळी आम्हा भावंडाना उठवण्यासाठी मोठ्या आवाजात भजनं आणि भक्तीगीतं  लावायची. “उठी उठी गोपाळा”, “पाऊले चालती पंढरीची वाट” वगैरे पासून ते अनुप जलोटा आणि गुलशन कुमार वगैरे सगळे आले त्यात. म्हणजे आताही ती गाणी पूर्ण आठवतात संगीतासकट! त्यावेळी चीडचीड व्हायची सकाळी सकाळी काय त्रास आहे म्हणून. पण आज जाणवतं की खरंच शांतता मिळायची त्या गाण्यांमधून एवढी चीडचीड करूनही. त्या वर्गातली नवीन अशी खूप गाणी बनतच नाहीत आता. पंढरीची वाट सुटून एकंदर सगळंच highway ला लागलंय..

तो लाडा-कोडाचा टेप माझ्या लहान्या भाऊ आणि बहीणीने मिळून शक्तिमानाच्या भक्तीत अर्पण केला. काय तर शक्तिमानासारखे गर-गर फिरायला घेतले दोघांनी आणि जाऊन आदळले त्यावर. दुरुस्तीच्या पलीकडे नेऊन सोडला त्याला..

बाकी मग मामांकडे होता टेप. सुटीत मग ऐकायला मिळायची गाणी. मामा आईपेक्षा लहान असल्याने त्यांच्याकडे “नवी” गाणी असायची. मला वाटतं कुमार सानू, अलका, कविता ही पिढी मामांमुळे introduce झाली.
त्यादरम्यान कदाचित दूरदर्शन सोडून दुसरे channels यायला सुरुवात होऊ लागली. कुठले एक चॅनेल होते नाव नाही आठवत पण त्यावर दिवसभर गाणी असायची. मला वाटतं गाण्याच्या “कचराकरणाला” तिथूनच सुरुवात झाली..नकोच जायला तिकडे..

आणि मग ओळख झाली walkman ची. ११/१२वी वगैरे उगवली होती मला वाटतं. गावाकडे काही आदीवासी लोक खांद्यावर टेप/रेडिओ घेऊन गाणी ऐकत फिरायचे. Walkman मला तेव्हा त्याचं आधुनिक स्वरूप वाटायचा 🙂
पण प्रवासात गाणी ऐकायची सवय त्यानेच लावली. पुण्याला इंजिनीअरिंगला admission मिळाल्यावर घर-पुणे असा रात्रीचा १२-१३ तासाचा प्रवास होता. तेव्हा मस्त गाणी लावून बाहेर काळोखात नजर हरवून विचार करण्याची सवय ह्या walkman चीच कृपा. सोनू निगमचा काळ होता तो. Private albums काढायचा trend सुरु झालेला होता तेव्हा. सोनूचा “दिवाना” ही default आणि सगळ्यात आवडती कॅसेट होती त्या प्रवासातली. आजही इतक्या वर्षानंतर जेव्हा केव्हा त्या मार्गाने प्रवास करायची वेळ येते तेव्हा तेव्हा खिडकीतून रात्रीचे बाहेर बघतांना डोक्यात एकदातरी दिवानाचे एकतरी गाणे वाजतेच!

साधारण त्या दरम्यानच पुण्याला मावशीकडे Sony ची music system घेतली गेली. बघून आणि ऐकून खरोखर आश्चर्य वाटलेलं. सगळंच नवीन होतं ते. मोठे स्पीकर्स, flashy display, एक बाजू संपली की आपोआप पलटणारी कॅसेट 🙂 अन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आवाजाचा दर्जा! भाऊ आणि त्याचे मित्रमंडळ karaoke लावून स्वत:च्या आवाजात गाणी record करत बसायचे, तरुण रक्त! 😀
मावशीला शास्त्रीय संगीताची आवड. म्हणजे आजही क्लासिकल म्हटलं की मला आधी तीच आठवते..

अन मग आले computers! तिथून सगळंच बदलत गेलं. कॅसेट ऐवजी आता हार्ड-डिस्क वर भरायची गाणी. WinAmp म्हणजे आमच्या पिढीचा मेगाफोन! हॉस्टेलला असताना computer चा वापर अभ्यासापेक्षाही गाणी ऐकायला जास्त केला! गुलज़ार तेव्हापासून कायमचा आपलासा झाला. ग्रुप मधल्या प्रत्येकीचा एक type होता गाण्यांचा,खिचडी व्हायची मग playlist ची. हॉस्टेल आयुष्याचा एक अविस्मरणीय भाग आहे तसा तो WinAmp अविभाज्य भाग आहे त्या hostel life चा. आजही मैत्रिणीचे आवडते गाणे लागले की संपूर्ण sessions आठवतात त्या गाण्यावरून हॉस्टेलला झालेले. आयुष्यभराच्या त्या मैत्रीत गाण्यांचाही मोठा वाटा आहे..

तिथून पुढे मग mobile ने गाणं ऐकणं वेगळ्या level ला नेऊन ठेवलं. सगळं काही बोटाशी. आधी आधी memory restrictions असल्याने ठराविकच गाणी फोनवर एकावेळी ठेवता यायची. आताच्या पिढीला हे झेपणारच नाही, म्हातारे झालोय आपण की पिढ्यांतर कमी व्हायला लागले आहे..सुपरफास्ट सगळेच! असो..
आता तर जागेला तोटा नाही हातातल्या फोन मध्ये. अन त्याचीही गरज काय सगळे cloud मध्ये असताना..
हवा तेव्हा पाडायचा गाण्यांचा पाऊस apps वापरून..निवांतपणा तेवढा कमी कमी होत चाललाय..

अन आतातर personal assistant आल्यापासून फक्त आज्ञा द्या, गाणी सुरु. नाही म्हटलं तरी निम्मा वेळ चुकीची गाणी लावतं ते पण कधी कधी त्यातूनही तुक्के लागून विसरायला झालेलं एखादं आवडतं गाणं लागून scene च बदलतो सगळा.

आता घरात to-do list आवरताना आम्ही नवरा बायको गाणी लावतो, लेकरू ऐकून ऐकून सध्या किशोर कुमार, लता, आशाचे हळू हळू फॅन व्हायला लागले आहे, आमच्या आधी तोच गूगल ताईंना order देऊन मोकळा होतो बऱ्याचवेळा..
कदाचित २०-२५ वर्षांनी तो लिहील किंवा म्हणेल…”मला आठवतंय माझ्या लहानपणी आई-बाबांना आवड होती गाणी ऐकायची…”

सगळं बदललं तरी चांगलं संगीत काळ, वेळ, नाती आणि माणसं जोडून ठेवतं..

 
4 प्रतिक्रिया

Posted by on जुलै 9, 2018 in Life, Music

 

कल भी..आज भी..

“Bye!”

नवरा office ला निघाला की तो नजरेआड होईपर्यंत मी तिथेच थांबते दारात.  नकळत ते ritual set झालंय. आपले आपणच घालून दिलेले काही नियम असतात. Logic वगैरेचा काही संबंध नसतो पण follow केल्याशिवाय काही रहावत नाही.

दार लावून मागे वळताच विचारांचे सगळे gears आपोआप change होतात. रोजच्या routine मध्ये असं मुरायला होतं की मेंदूला विशेष असं काही करावं लागत नाही. Muscle memory सगळा कारभार सांभाळून घेते. पुढचा साधारण एखाद तास तसाच जातो tasklist clear करण्यात.

मुलाला-तयार-करून-वेळेत-वरात-घराबाहेर-काढा हे एक साधं वाक्य तुमच्या दिवसाचा एक मोठा भाग असतं. त्याच्या तंद्रीनुसार तुम्हाला रोज unpredictable वाटेवरून जावं लागतं. ते कोडं असतं ना,  maze मधून उंदराला cheese पर्यंत पोचवण्याचं..entry आणि exit points ठरलेले असले तरी एक पाऊल पुढे, दोन मागे असा खेळ करत कष्टाचं “चीज” करायचं  😀  ह्या प्रोसेस मध्ये कधी डोक्याचा भुगा होतो तर कधी एकदम हसत खेळत सगळं पार पडतं. Predictable काहीच नाही एवढंच काय ते predictable!

वेळ एकच दाखवत असल्या तरी सतरा प्रकारच्या घड्याळी पाळत असतो आपण. त्या सगळ्या एकमताने वेळेची साक्ष देत असल्या तरी आपले स्वत:चे काही मापदंड ठरलेले असतातच आपण वेळेवर आहोत की उशिरा हे confirm करणारे. जसे parking मध्ये शेजारची car आहे की गेलीये, नेहमीच्या वाटेवर असणाऱ्या stop वरची bus आहे की गेलीये..अगदी खात्रीचे मोजमाप म्हणजे निघताना रोज लावल्या जाणाऱ्या नेहमीच्या playlist मधले कोणते गाणे संपत आले आहे.. 🙂

Commute time मला खरंच आपला स्वत:चा वाटतो. कदाचित तोवर सकाळच्या कामांचा  एक मोठा टप्पा पार पडलेला असतो त्यामुळे डोक्याला शांतता लाभलेली असते. ह्या वेळात ठरलेली गाणी नाही ऐकत मुद्दाम. लावायचा radio. मजा असते. अर्ध्यापेक्षा जास्त वेळा डोक्याला shot देणारीच गाणी लागतात तशी. अगदीच असह्य झालं तर सरळ news ऐकायला घेऊन अजून डोकं जड करून घ्यायचं. पण कधी कधी लागतं आवडणारं गाणंही. ठरवून ऐकायला घेतलेलं favourite गाणं अन असं radio ने ध्यानी मनी नसतांना ऐकवलेलं तेच गाणं..गाणं एकच असलं तरी होणारा आनंद अगदी वेगळा. “Expected” आणि “Unexpected” ह्यातला फरक संदर्भासहित स्पष्ट!

गाण्यांमध्ये तुम्हाला स्थळ आणि काळाच्या पलीकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य असते. जड शब्दात सांगायचे झाले तर “ह्या मोठा विश्वाच्या पसाऱ्यात धुळीच्या कणाएवढ्या रस्त्यावरील असलेल्या गाडीत गाणी ऐकणाऱ्या तुमच्या मनात एक total नवीन विश्व निर्माण होतं तेवढ्या काही क्षणांत!” Amazing आहे सगळंच! अन मग खाडकन drivingचे-नोबेल-ह्यांना-द्या-वर्गातले कुणीतरी तुम्हाला आहे त्या विश्वात परत आणते.  ही मंडळी तुम्हाला “ह्या क्षणात” जगायला शिकवते हे मात्र तेवढंच खरं. प्रत्येक अनुभवात एक तरी जमेची बाजू असतेच 🙂

एव्हाना हे सगळे सुरु असताना तुमचा मेंदू halfway office मध्ये पोचलेला असतो. आज काय करायचे आहे, काय महत्त्वाचे आहे वगैरे वगैरे..बराचसा भाग mechanical थोड्या फार फरकाने. कधी आगी लागलेल्या असतात कधी भयाण शांतता. लोकांपेक्षा मुखवट्यांसोबतच जास्त deal करायचं असतं त्या जगात. पण नाही म्हणायला ह्या जत्रेतही आपली म्हणता येतील अशी मैत्रीची  ४ माणसं जोडली जातातच. कामाचं स्वरूप, load, teams etc बदलत राहतात पण ही unique connections नाही. मला तरी आजवर गेले तिथे अशी लोकं भेटत आली आहेत. Office life  खरंच सोपं होऊन जातं त्यांच्यामुळे. बाकी office हा मुद्दा बराच ऐसपैस आहे बोलायला घेतला तर..

दिवस संपण्याच्या दिशेला लागला की पुन्हा उरलेलं routine तुम्हाला व्यस्त ठेवतं.

थोड्या फार फरकाने आठवड्याचा प्रत्येक दिवस ‘थोडक्यात’ असाच जातो. Weekends ची कथा वेगळी. आठवडा तुम्ही असा weekend ची वाट बघत लढवता, एकामागून एक..अन ह्या खो-खो मध्ये पूर्णच्या पूर्ण वर्ष संपल्याची खाडकन जाणीव होते. खाडकन! मागोवा, सिंहावलोकन, introspection…काहीही करायला घ्या..त्यातून जे काही बाहेर येते किंवा जाणवते ते खरंच हलवून सोडतं तुम्हाला तेवढे काही क्षण..एवढा काळ सरून गेला काही कळायच्या आत?काय हरवले, काय मिळवले? काय करायचे आहे, काय राहून गेले? काय बरोबर होते, आणि काय चूक? त्या मंथनाला अंत नाही.

दिवसाचं, आठवड्याचं, महिन्याचं, वर्षांचं routine आणि planning करत राहतो माणूस. आज हे करायचे, पुढच्या आठवड्यात ते, ६ महिन्यांनी अमुक आणि काही वर्षांनी तमुक..Amazing आहे माणसाचं हे optimism!  हा आशावादच चालतं ठेवतो सगळ्यांना. अधून मधून त्या आशावादाला challenge करणारे बरेच काही घडत असते. अन त्यावेळी खोल खोल मनात काहीतरी नकळत रुजतं, आपल्याला कुठेतरी बदलतं, आजमध्ये जगायला शिकवतं. दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत तश्या आणि एकमेकांना पुरकही. आजमध्येही जगता यायला हवं आणि उद्याचाही विचार डोक्यात असावा. कुठलं तरी एक टोक धरून ठेवलं तर तोल जाणारच.

म्हणून लहान लहान गोष्टीतून आज, ह्या क्षणात मिळणार आनंद सुटू द्यायचा नाही आणि उद्या डोक्याला ताप होईल एवढंही आजमध्ये अडकून पडायचं नाही. पुढच्या पायरीवर ठेवलेले पाऊल आपल्याला पडू देणार नाही ही खात्री झाल्याशिवाय आपण मागची पायरी सोडत नसतो, आणि पडू-झडू ह्या भीतीने आहे त्याच पायरीवर मुक्कामही ठोकत नसतो 🙂

चालत रहायचं अन जगतही!

 
यावर आपले मत नोंदवा

Posted by on डिसेंबर 18, 2017 in Life

 

खरंच किडींग…

#”लाभ”ले-भाग्य-आम्हासी

दोन बोके, माकड आणि लोण्याचा गोळा..बाबा अक्षतला गोष्ट सांगतात.
“दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ” ह्याचे detail स्पष्टीकरणही देतात.
काही दिवसांनी बाबा उगाच surprise test घेतल्यासारखं “अक्षत, दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ म्हणजे काय रे?”
“म्हणजे, आई बाबा भांडे घेतात आणि मी लाभ घेतो” 😀 😀 😀

********************************************************************************

#एक-से-भले-दो-तीन

मध्येच बाबाना मराठी गाणी ऐकायची लहर येते. त्यातलं एक अक्षतला आवडून जातं “हे जीवन सुंदर आहे”.
मग त्याच्यावर काही दिवस ह्या गाण्याचा प्रभाव..येता जाता गायन होतं. अन मग एका भल्या सकाळी तानसेन गायले:
“हे जीवन सुंदर आहे,
हे जीवन सुंदर आहे,
हे जीटू सुंदर आहे,
हे जीथ्री सुंदर आहे….” 😀 😀 😀

********************************************************************************

#दे-धप्पा

कुठेतरी धडपडून आला आणि चौकशी करायला गेलं “कसा पडलास तू नेमका?”
उत्तर: “धप्पकन!!” 😀 😀

********************************************************************************

#कळे-ना-वळे

काहीही नवीन झालं घरात की साहेब लगेच notice करतात. अन applicable असलं तर compliment द्यायलाही कचरत नाहीत.
एकदा त्याला म्हटलं “अक्कू, तुझी बायको कायम खूष राहील.”
पहील्यांदा ऐकला त्याने हा शब्द त्यामुळे लगेच antenna वर.
“बायको? काय असतं बायको?”
“अर्रे, बायको म्हणजे wife”
“Ohh, I don’t like that”
“Why?”
“I don’t like horrible things” 😀 😀 😀

********************************************************************************
#न्यूटनच्या-नावाने-चांगभलं

मैत्रिणीसोबत खेळणं सुरु होतं. आपला favorite चेंडू तिला खेळायला दिला. ती आपली चेंडू वर फेकून झेलायचा प्रयत्न करत होती. ह्याच्या चेहऱ्यावर जरा tension, शेवटी रहावलं नाही आणि म्हणालाच
“Don’t throw it very high, it will go up in the outer space and will not come back!!!!” 😀 😀 😀

********************************************************************************

#सूचना-समाप्त

खेळायला निघाली स्वारी आणि आईच्या रोजच्या सूचना सुरु..”Bike घेऊन रस्त्यावर जायचं नाही”, “अंधार पडायच्या आत घरी यायचं” वगैरे वगैरे..
वैतागून म्हणाला शेवटी “Aai, How many times!! Everyday you tell me the same thing!!!”
“Akshu, that’s what mothers do. They give you same instructions again and again!”
“But Aai, I don’t need any constructions!!!” 😀 😀 😀

********************************************************************************

#जमीनदोस्त

Daycare मध्ये दंगा घालून आल्यावर संध्याकाळी बाबांना reporting सुरु होते.
“Baba, we danced today!”
“अरे वा! कशावर?”
“On the floor” 😀 😀 😀

********************************************************************************

 
4 प्रतिक्रिया

Posted by on नोव्हेंबर 21, 2017 in Humor, kids

 

जर-तर..

Midlife crisis वगैरेचा परिणाम असावा, राहून राहून गत आयुष्याचं “सिंहावलोकन” (कसला अवजड शब्द आहे हा!) करायला होतं. अन मग “यूँ होता तो क्या होता” हा algorithm आयुष्यात घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचे पर्यायी निर्णय highlight करून तुमच्या डोक्यात धिंगाणा घालतो.

मजेशीर असतं प्रकरण. “किस्मत ने मुझे आज ऐसे दोराहेपर (कधी कधी चौराहेपर 😀 ) लाकर छोडा हैं जहाँ से एक रास्ता अमुक देतो आणि दुसरा तमूक देतो”. तो प्रत्येक दोराहा/चौराहा आयुष्यात त्या-त्या वेळी जन्म-मरणाचा प्रश्न असतो. निवड करण्याची वेळ आली म्हणजे तुमच्याकडे नक्कीच options असतात. Options नसले कि काहीवेळा खरंच सोपं होऊन जातं सगळं. जसं फक्त दूरदर्शन होतं तेव्हा डोक्याला ताप नव्हता काय बघायचे ह्याचा. लागेल ते बघायचे.

अर्थात मानवी बुद्धीला असं stagnation सहन होत नाही, मग “अजून थोडं, थोडं अजून” किंवा “ह्याच-pattern-मध्ये-दुसरा-रंग-आहे-का?” types गाजरामागे सगळी धावपळ.

अन ही पळापळ खूप काही शिकवते तुम्हाला.
तुम्हाला तुमच्यातला नवीन तुम्ही गवसतो..
आयुष्य नव्याने कळते..
लोकांचे नवीन चेहरे, मुखवटे बघायला मिळतात..
आयुष्य एखादं सुखद स्वप्न आहे असा अनुभव हाती येतो त्या प्रवासात कधी-कधी..
तर बऱ्याचवेळा सगळं कसं अवघड अन असह्य आहे अशी सल..
ही पण गम्मत असते खरी, चांगलं असलं काही की ते मोहरीएवढं भासतं अन वाईट असलं की कसं डोंगराएवढं वाटतं.
हा प्रवास तुम्हाला कधी मवाळ बनवतो, तर कधी जहाल..
प्रत्येक अनुभवातून तुम्ही नवीन काहीतरी शिकत असता, बदलत जाता कुठेतरी स्वत:ला.

पण खोल आतला एक तुम्ही कधीच बदलत नसतो. कुणाचा “तो” त्या व्यक्तीला खंबीर ठेवतो तर कुणाचा भरकटायला भाग पाडतो.
आणि हाच तो factor तुमच्या आयुष्याची दिशा आणि दशा दोन्ही ठरवत असतो.

त्यामुळे भूतकाळात आपण असं-न-करता-तसं-केलं-असतं-तर वगैरे कटकटीत करमणूक म्हणून पडायला हरकत नाही.
कारण कुठलाही निर्णय घेतला तरी शेवटी तो निभवायचा तुम्हालाच असतो. निर्णय योग्य किंवा अयोग्य नसतो. तो तुम्ही कश्या पद्धतीने घेता आणि महत्त्वाचं म्हणजे तो कसा निभावून नेता ह्यावर त्याची योग्यता ठरत असते.
कुणीतरी म्हणून गेलंय:
“Sometimes you make the right decision, and sometimes you make the decision right”
बस,आवश्यक तेवढा वेळ त्याला द्यायला हवा. सगळंच instant नसतं.

अर्थात किती वेळ द्यायचा हा पुन्हा एक नवीन निर्णय 🙂

 
यावर आपले मत नोंदवा

Posted by on ऑगस्ट 18, 2017 in Life

 

मुक्ताफळं..

संसार जस-जसा मुरत जातो तस-तसे नवरा बायको एकमेकांना पारखून strategies शोधून काढतात problem solving च्या. प्रपंच सोपा होऊन जातो त्याने 🙂

जसे नवीन नवीन नवरा मला जेव्हा केव्हा विचारायचा “हे/ते कुठे आहे गं?”
तेव्हा तेव्हा मी पडत्या फळाची आज्ञा मानून शोधकार्याला लागायचे किंवा वस्तू आणून नवऱ्याच्या हातात द्यायचे.
मग काही वर्षांनी..स्वतः धावपळ न करता वस्तूचे whereabouts सांगायला सुरुवात केली.
आणि मग साक्षात्कार झाला की १० पैकी साधारण ७ वेळा हवी असलेली वस्तू साहेबांच्या डोळ्यासमोर किंवा नजरेच्या टप्प्यात असते पण तरी त्यांच्या लक्षात येत नाही. त्यावरून आदळ-आपट व्हायची. त्यामागे एक वेडी आशा असायची की निदान त्यामुळे तरी पुढच्या वेळी समोर असलेली वस्तू “दिसेल”.
पण त्याने काही खास फरक पडला नाही.
आणि मग खरी दिव्य types ची अनुभूती झाली. दोष त्याचा नाहीच अजिबात.
होतं काय की वस्तू जरी समोर असली तरी जोवर नवरा त्याबद्दल मला “कुठे आहे गं?” असं विचारात नाही तोवर त्याचे शोध सुरु करणारे neurons मेंदूकडे तो संदेश घेऊन जात नाहीत. ते जादुई वाक्य बोलताच त्याचा मेंदू कामाला लागतो आणि मग हवी ती वस्तू सापडते 😀
त्यामुळे पहिल्यांदा विचारलेलं “xyz कुठे आहे गं?” हे मी आता seriously घेत नाही. कारण ते माझ्यासाठी नसतंच! त्यानंतर जे येतं त्याला मी आहे तिथून उत्तर देण्याचा पर्याय वापरते. अन त्यानंतरही जर विचारलं गेलं तर मग त्याला पडत्या फळाची आज्ञा वगैरे मानायच्या वाटेला जाते.

अन समतोल राखला जावा ह्या धर्तीवर नवरा पण माझ्या अनेक गोष्टी आधीसारख्या seriously घेत नाही 😀
राजहंसासारखं कौशल्य आत्मसात केलय त्याने दूध आणि पाणी वेगळं करण्याचं 🙂
त्यामुळे मला अजून कष्ट घ्यावे लागतात काही बाबतीत. जसे birthday, anniversary च्या आधी जे gift अपेक्षित आहे त्याबद्दल नवऱ्याला पदोपदी hints देत राहणे. पण त्यामुळे आता तोही hints ना “राजहंस” mode on करूनच process करतो 😀

ह्या घोड्या-कुरघोड्या कुठेतरी सुवर्णमध्य साधून घेतातच.
एकमेकांच्या अश्या छोट्या छोट्या क्लृप्त्या दोघंही ओळखून आहोत आम्ही आता.
त्यामुळे “कुठे आहे गं?” सारखा प्रश्न खरंतर सगळं काही ठीक आहे ह्याचीच खात्री देतो.
“Peace..inner peace” वालं feeling.

हे असं कणभर कणभर म्हणत मिळणारं बळंच कधीतरी मणभर होऊन जातं. ते मग पुरून उरतं एखादा out of syllabus प्रश्न जर येऊन उभा राहीलाच तर.

 
१ प्रतिक्रिया

Posted by on जुलै 2, 2017 in Life

 

देखते है इस पोस्ट को कितने likes मिलते हैं :D

“जो भी इस post को like करेगा उसे सुबह तक जरूर एक खुशखबरी मिलेगी”
Post मध्ये वार-तिथीनुसार देवाचा फोटो..
Facebook प्रकरण आल्यापासून आता देवालाही tech-savvy वगैरे व्हायला लागलं असणार नक्की. कोण कोण आपल्या फोटोला like करतंय किंवा खरंतर कोण कोण like करत नाहीये त्यांचा हिशोब ठेवायचा म्हणजे काय खेळ नाही..
वर comment वाल्याना special treatment.
अश्या post बघितल्या कि मला त्या फोटोतला देव डोक्याला हात लावून बसलेलाच जास्त दिसतो.
Zuckerberg च्या स्वप्नात रोज नक्की येत असणार तो, त्याला झापायला..
Mark कुठे एकटा आहे म्हणा, आजकाल तर LinkedIn वरही साईबाबा अन वैष्णोदेवी पाण्यात ठेवलेले बघायला मिळतात..

अजून एक category..
परवा मला whatsapp वर एक message आलेला. मातेच्या चमत्काराचा अन तो पुढे n टाळक्यांना पाठवला नाही तर काहीतरी भयानक घटना घडेल माझ्यासोबत. लहानपणी अश्या types ची एका देवीच्या नावाने postcards यायची घरोघरी..अन मग chain reaction..

श्रद्धा ही अशी comments/likes/shares/forwards च्या आधारावर सिद्ध करावी लागणारी गोष्ट नाही.
ती तुमच्या मनात फक्त खोलवर रुजलेली असावी लागते..
ती तशी रुजली की आपोआप छान छान गोष्टी घडायला लागतात आयुष्यात 🙂

ह्याशिवाय अजूनही बऱ्याच posts बघायला मिळतात..
“Only genius can solve this” वाली कोडी..
“शाहरुख-गौरीच्या फोटोला सहज लाखो likes मिळतात, पाहूया आपल्या मराठमोळ्या जोडीला किती likes मिळतात ते”
“अमक्या तमक्या actress/actor ला हजारो likes मिळतात, बघूया ह्यांना (current affairs नुसार जे कुणी applicable असतील ते) किती मिळतात ते”..
“खरा भारतीय like केल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही”..
२ फोटो – एकासाठी like अन दुसऱ्यासाठी comment चे option..
कुणीतरी आजारी आहे हे दाखवत 1 like = 1 रुपया वगैरे समीकरण वापरून बाजार मांडला जातो..

अन अश्या posts ना किलोने likes/comments ही असतात..
ते करताना नेमका कोणता विचार लोकांच्या डोक्यात येत असेल ह्यावर खरंच research व्हायला हवा.
प्रेम? भीती? आदर? अंधानुकरण?

प्रकार खरंच powerful आहे 😀

झुकती है दुनिया, झुकानेवाला चाहिए हे त्रिकालाबाधित सत्य आहे..

एवढा हटके उपयोग पाहून ते social media वाले पण चक्कर येऊन पडतील..

खरंतर एवढं छान अन literally “at your fingertips” माध्यम उपलब्ध आहे ह्या social networking किंवा technology च्या रूपात.
आधी सोप्या कुठे होत्या गोष्टी..२ शब्दाची तार करायला हजार वेळा विचार केला जायचा, phone वगैरे प्रतिष्ठा, श्रीमंतीचे लक्षण असायचे, अगदी २५-३० वर्षांपूर्वी emails check करण्यासाठी काही शेकडो वगैरे किलोमीटर प्रवास करायला लागायचा. अन म्हणूनच तेव्हा लोक त्याचा “सदुपयोग” करायचे..

आता आहे त्याचा “दुरुपयोग” सोडून नुसता “उपयोग” ही केला गेला तरी खूप आहे 🙂

ह्या नवीन माध्यमांचा वापर आपण खरंच चांगल्या गोष्टी, नवीन माहीती-ज्ञान share करण्यासाठी करू शकतो. त्यायोगे नवीन अनुभवांची देवाण-घेवाण होऊ शकते आणि खरंच लोकांची आयुष्य चांगल्या पद्धतीने बदलू शकतात.
देखते है जास्तीत जास्त लोक कधी तसं करते है 😀

तोवर देवा, तुला डोक्याला हात मारून बसावंच लागेल जाता-येता 🙂

 
१ प्रतिक्रिया

Posted by on ऑगस्ट 21, 2016 in Humor, Misc

 

खडख[डे]…

काय काय characters असतात जगात..आपलं अस्तित्व(?) वेळोवेळी सिद्ध करतात..>

त्यातलीच ही एक बाई..फक्त नावात ‘दिवस’, बाकी सगळा अंधारच..
वर्तमानात जे काही trending आहे त्या क्षेत्रात नाक खुपसायचं, काहीतरी वायफळ बोलायचं अन स्वत:चा “जाहीर सत्कार” करून घ्यायचा..
म्हणजे असं काहीसं “चला बरेच दिवस झालेत, आपण काहीच कसे पचकलो नाही! बाप रे, लोक आपल्याला विसरतील..”
अन मग “उतावळा नवरा..” types काहीतरी विधान करायचं..माकडाच्या हाती कोलीत दिल्यासारख नाना social media उपलब्ध ह्यांना जगभर थैमान घालायला..
हे तिनं इतक्या वेळा केलंय की तिचे नाव आता ह्या particular उपक्रमासाठी लवकरच एखाद्या dictionary मध्ये “noun”/”adjective” म्हणून add सुद्धा केले जाईल..

खरं तर नवरा म्हणतो तसं हीला complete ignore मारायला हवं, पण हीच्या latest stunt ने खरंच डोकं हलवलं..

कुणी कसे काय त्या खेळाडूंवर असली baseless comment मारू शकतं जे आपल्या देशात अजिबात commercial नसलेल्या खेळांमध्ये काहीतरी करायचंच म्हणून देशाला Olympics मध्ये represent करत आहेत??
कितीतरी वर्षांपासून साधना केल्यासारखं हजार अडचणी पार करत ते तिथपर्यंत पोचले आहेत..तिथे पोचणं हीच खूप खूप मोठी गोष्ट आहे..
देशाची बहुतांश लोकसंख्या आजही academics ला जास्त महत्त्व देते, अन ते चुकीचेही नाहीये survival चा basic struggle बघता..
अनेक खेळांसाठी basic support system किंवा infrastructure हवे तेवढे सहज उपलब्ध नाहीये..

पण असे background असूनही स्थळ/काळ ह्यांच्या पलीकडे बघत हे खेळाडू outliers बनत काहीतरी inspiring करण्याचा प्रयत्न करताय..कितीतरी वर्षांपासून..
त्यांचा संघर्ष सगळ्यांनाच माहीत होत नाही, अन झाला तरी तो आपल्याला पूर्णपणे समजू शकत नाहीच..आपण त्याला relate/connect करूच शकत नाही..
ह्यांचा प्रवासच वेगळ्या वाटेचा..

ठरवूनही १०-२० minitues व्यायाम करायला केवढी मानसिक तयारी लागते आपल्यासारख्या सामान्य जीवांना..
अन हे लोक काय काय मागे सोडून आपली वाट आपणच शोधत पुढे जात आहेत..

बरीच लोकं बघायला मिळतात ज्यांच्यासाठी मणभर संधी, प्रेरणा आणि सोयी अगदी सहज उपलब्ध असतात अन तरीही ते त्याचं सोनं करत नाहीत..
इथे ही लोक कणभर inspiration अन आशेवर मोठी स्वप्न बघत लांबवर पोचतात..

त्यांना त्यांच्या खेळांत खूप मोठा, वैभवशाली वारसा लाभला नसला तरी जेवढं मिळालंय त्याला मोठं करण्याचा प्रयत्न करत आहेत..
पुढच्या पिढ्यांना हेच प्रेरणा देतील..जो त्यांना स्वात:ला लाभला नाही तो वारसा देतील..

हेच त्यांनी जिंकलेलं खूप मोठं medal असेल..

कुठल्याही प्रकारे अश्या स्वप्नवेडया जीवांना मदत करायला जमत नसेल तर कमीत कमी त्यांच्या वाटेतला तो खडा तरी बनू नये जो गाडीचे मोSSठे नुकसान करत नसला तरी चर्र्कन एखादा ओरखडा तरी उठवून जातोच..

अन ह्या बाई म्हणजे day-to-day खडे 😀

बाकी एक मात्र खरंय, ह्यांच्या प्रत्येक खडखडीच्यावेळी एरव्ही hibernation मध्ये असलेले एकीचे बळ जनतेत उफाळून येते..

Every cloud has a silver lining 😀 😀 😀

 
2 प्रतिक्रिया

Posted by on ऑगस्ट 10, 2016 in India, sports

 
 
Dr.Rupali Panse

"BELIEVES IN WRITING, READING & WATCHING ALL THATS WORTH ON EARTH!!";

काय वाटेल ते........

महेंद्र कुलकर्णीचा मराठी ब्लॉग........

suvslife

This is about my life and experiences and memories from different stages of it.

WordPress.com

WordPress.com is the best place for your personal blog or business site.